Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, ‘युती होईल पण ठरलेलं काहीही नाही’ , तर सेना नेतेही म्हणतात, ‘युती होईल पण समाधान झाल्याशिवाय नाही’ !!

Spread the love

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने “आमचं ठरलंय !” असे सांगत असता भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं सांगितलं आहे. तसंच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रविवारी २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही  सांगितलं नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जे कोणी केंद्रीय मंत्री असतील  ते पत्रकार परिषदेत असतील असं ते म्हणाले.

शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचंही  सांगण्यात येत आहे. शिवसेना १२६ जागांवर लढणार असून, भाजपा आणि मित्रपक्षांसाठी १६२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते.

दरम्यान शिवसेना भवनवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. शिवेसनेचे सचिव अनिल देसाई यांनी १०० टक्के युती होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीचा पूर्वभाग म्हणून बैठक बोलावण्यात आली असल्याचं सांगितलं. यावेळी अनिल देसाई यांनी आम्ही समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा होऊन युतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या किती जागा लढणार आहोत यासंबंधी आपण सांगू शकत नाही. सध्या अंतिम चर्चा सुरु आहे. चर्चा सकारात्मक सुरु असून युती होईल. पण समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही,” असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी अमित शाह यांच्या मुबंई दौऱ्यात किंवा त्याअगोदर युतीची घोषणा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!