महाराष्ट्र विधान सभा २०१९ : अखेर १४४ जागांचा हट्ट सोडून शिवसेना भाजपसोबत तडजोड करण्यासाठी राजी आणि ठरला हा फॉर्म्युला !!

कोणत्याही क्षणी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक घोषित होण्याची शक्यता असताना बहुचर्चित शिवसेना-भाजपने जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे वृत्त आहे. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या फॉर्म्युल्याला नाही हो म्हणत अखेर हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.
भाजपकडून १४४ जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा नाही अशा वल्गना शिवसेनेकडून करण्यात येत होत्या मात्र वास्तविक परिस्थिती लक्षात घेता युती करायची असेल तर भाजप देईल तितक्या जागा घेण्याशिवाय दुसरा पर्याय सेनेसमोर नव्हता हे उघड आहे. आणि झालेही तसेच सेनेने आपला १४४ जागांचा हट्ट सोडून १२६ जागांवर सेना राई झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते कि , भाजप-शिवसेना युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला १६२ जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना १२६ जागा लढविण्यास तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सांगावा घेऊन शिवसेना नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतरच हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’चा नाशिकमध्ये गुरुवारी समारोप झाला. यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्याचा दावा केला आहे.
शिवसेनेकडून याआधी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आलेला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मात्र चंद्रकांत पाटील यांनी युतीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने शिवसेना आता काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावं लागेल.