उदयनराजेंच्या वक्तव्यावर बोलले शरद पवार , … मी भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील !!

राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करताना ‘राष्ट्रवादी सत्तेत असताना फक्त आडवा आणि जरवा, हेच धोरण होते,’ असा आरोप केला होता त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
पवार म्हणाले कि ‘उदयनराजे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. सकाळी माझ्या घरी झालेल्या बैठकीत उदयनराजे यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकण्यात आली होती, त्याला त्यांनी होकारही दिला होता परंतु दुपारनंतर उदयनराजेंनी आपला निर्णय बदलला.
‘आम्ही सत्तेत असताना उदयनराजेंची कोणतीही कामे रोखली, असं माझ्या पाहण्यात नाही. त्यांची काही खासगी कामं रोखली असतील तर मला माहीत नाही. पण मी त्याविषयी आता भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील,’ असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवारांनी याबाबत भाष्य केलं आहे.
‘तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?’ असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.’