Gujrat : ब्रेडलाईनर बेकरीचे नितीन पटेल “असा” साजरा करीत आहेत आज मोदींचा वाढदिवस !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील सुरत या ठिकाणी असलेल्या एका बेकरीने ७०० फूट लांबीचा आणि ७ हजार किलोंचा केक तयार करण्यास सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यासाठी सुरतमधल्या या बेकरीने ही तयारी सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचे सुरत येथील ‘ब्रेडलाईनर बेकरी’ने ठरवले आहे. त्याचमुळे ७ हजार किलो वजनाचा आणि ७०० फूट लांबीचा केक तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सुरतमधील ७०० प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येईल असंही ब्रेडलाईनर बेकरीच्या मालकांनी सांगितलं. भ्रष्टाचारमुक्त भारत ही या केकची थीम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तर सुरतमधल्याच अतुल बेकरीने ३७० शाळांमध्ये अन्नाची १२ हजार पाकिटांचं वाटप करण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० हटवलं त्यामुळेच ३७० शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नाची पाकिटं दिली जाणार आहे. आपल्या देशाला कुपोषणाची समस्या भेडसावते त्या समस्येतून बाहेर पडण्याची एक सुरुवात म्हणून आणि या समस्येला तोंड देण्यासाठी ही पोषण आहाराची पाकिटं वाटण्यात येणार आहेत असं अतुल बेकरीच्या मालकांनी सांगितलं.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७ हजार किलोंचा जो केक तयार करण्यात येणार आणि जे सेलिब्रेशन होणार आहे त्यासाठी हजारोंच्या संख्येने मोदी समर्थक उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असं ब्रेडलाईनर बेकरीचे नितीन पटेल यांनी सांगितलं.