भारतातील मंदिर आणि रेल्वे स्टेशन उडविण्याची जैश-ए- मोहम्मदची धमकी

पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘जैश ए मोहम्मद’नं मुंबईसह देशातल्या विविध राज्यांमध्ये घातपाती कारवाया करण्याची धमकी देणारं पत्र पाकिस्तानातून हरियाणातल्या रोहतक रेल्वे जंक्शन (Rohtak Junction) च्या अधिक्षकांना मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
जैश (Jaish-e-Mohammed) ने या पत्रात मुंबईसह ६ राज्यांमधली महत्त्वाची मंदिरं स्फोटांनी उडवून देण्याची धमकी दिलीय. मसूद अहमद याच्या नावाने ते पत्र असून त्याने स्वत:ला जम्मू आणि काश्मीरचा एरिया कमांडर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून सुरक्षा संस्था त्याचा आणखी तपास करत आहेत. ८ ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हे स्फोट घडवून आणण्यात येतील असंही या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात मुंबई, रोहतक जंक्शन, रेवाडी, हिसार, कुरुक्षेत्र, बंगळुरु, चेन्नई, जयपुर, भोपाल, कोटा आणि इटारसी रेल्वे स्टेशन आणि राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधली महत्त्वाची मंदिरं उडविण्याची धमकी दिली आहे. या पत्रानंतर सुरक्षा संस्थांनी संबंधीत सर्व विभागांना सावध राहण्याच्या सूचना केल्याआहेत. त्याचबरोबर रेल्वे आणि महत्त्वांच्या इमारतींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलीय.