राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित करतोय आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद , पाकिस्तान वगळून ७० देशातील माध्यम प्रतिनिधींना निमंत्रण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत या महिन्याच्या अखेरीस विदेशी मीडियाशी संवाद साधणार आहेत. पाकिस्तान वगळून ७० देशातील विदेशी मीडियाला संघाने याबाबतचं आमंत्रणही दिलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पहिल्यांदाच संघाकडून हा संवाद साधला जाणार असल्याने त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधलं गेलं आहे.
विविध मुद्द्यांवर संघाचा काय दृष्टिकोण आहे, हे जागतिक मीडियाला समजावे आणि गेल्या अनेक वर्षांपासून संघाबाबतचे जे गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करण्यासाठीच हा संवाद साधला जाणार असल्याचं संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं. भागवत जगभरातील मीडियाशी अनौपचारिक चर्चा करतील. या चर्चेचा कोणताही भाग प्रसारण किंवा प्रकाशित करण्यात येणार नाही. तसं करण्यास मनाई असेल, असंही या पदाधिकाऱ्याने सांगितलं.
आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. भागवत बैठकीचं उद्घाटन करतील. त्यानंतर त्यांचं भाषण होईल. त्यानंतर प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू होईल. या बैठकीच्या आयोजनाची तयारी संघाचा प्रसिद्धी विभाग करत असल्याचंही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केलं. याबाबतची तारिख लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.