१०० दिवसात आजपर्यंत कुठल्याही सरकारने इतके महत्वाचे निर्णय घेतले नाहीत : प्रकाश जावडेकर

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास आज १०० दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेतला. ‘१०० दिवसांत इतके महत्त्वपूर्ण आणि इतके जास्त निर्णय अन्य कुठल्या सरकारने घेतले नसतील,’असं ते म्हणाले. ‘जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, तीन तलाक प्रथा बंद करणं ही सरकारची महत्त्वाची कामगिरी आहे.
गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीर वेगळा पडला होता. तेथील नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता जम्मू-काश्मीर आणि लडाखला सर्व योजनांचे लाभ मिळू लागले आहेत. पाकिस्तानने सगळ्या जगाचे दरवाजे ठोठावले, पण संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभं राहिलं.’
जावडेकर पुढे म्हणाले, ‘तीन तलाक, पॉक्सो, समान वेतन, ६ कोटी लहान व्यापारी आणि १४ कोटी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याच्या योजनेसारखे महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतले. आयुष्मान भारत, उज्वला गॅस योजनेची व्याप्ती पूर्ण भारतभर वाढवली.’ मोदी सरकारच्या काळात गरीब, मजूर, शेतकरी, आदिवासी सक्षम बनतील असे निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.