Jammu and Kasmir : 50 हजार रिक्त जागांसाठी केंद्राची मेगा भरती , राज्यपाल सत्यपालसिंह

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी मेगा नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ उठवण्याचं आवाहनही मलिक यांनी केलं आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या दोन ते तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असून काश्मिरी जनतेने या सरकारी सेवेत दाखल व्हावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी फोन आणि इंटरनेटचा वापर करत होते. इंटरनेटद्वारे काश्मिरी जनतेच्या भावना भडकावण्याचं काम सुरू होतं. भारताविरोधात हे हत्यार वापरण्यात येत होतं. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचं आवश्वासन त्यांनी दिलं. कुपवाडा आणि हंदवाडामध्ये मोबाइल फोन सेवा सुरू करण्यात आली आहे, इतर जिल्ह्यातही लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
काश्मीरबाबत अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलनं झाली. पण त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. आमच्यासाठी प्रत्येक काश्मिरींचा प्राण महत्त्वाचा आहे. काही लोक हिंसक होऊ पाहत होते. त्यांना कमरेखाली मार लागल्याने जखमी झाले आहेत, असं मलिक म्हणाले.