Aurangabad : देवानगरी रेल्वे क्रॉसिंगजवळ रंगला आत्महत्येचा खेळ !! तीन रेल्वे थांबवून अखेर विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी “त्या ” तरुणाला वाचवले !!

औरंगाबाद शहरातील संघर्ष मधील देवानगरी रेल्वे क्रॉसिंग म्हणजे जणू सुसाईड स्पॉटच झाला आहे . अनेक जण या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी येतात हाच आजवरचा अनुभव आहे. या पैकी बऱ्याच जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे कार्य देवनागरीतील विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील , शिवानंद वाडकर आणि ओंकार सोशल ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते तत्परतेने करतात हे विशेष आजवर त्यांनी अनेक जणांना वाचवण्यात यश मिळवले आहे . कालही असाच प्रकार घडला याच ठिकाणी व्हाइटनर प्राशन करून आलेल्या एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे लोहमार्गावर तब्बल तीन रेल्वे थांबवाव्या लागल्या. तरुणाची वारंवार समजूत काढून त्याला लोहमार्गावरून बाजूला नेल्यानंतर तो पुन्हा आत्महत्या करण्यासाठी रुळांकडे धावत होता. अखेर या तरुणाला उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
देवानगरीतील जुन्या रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४जवळ सकाळी एक १८ वर्षांचा तरूण आत्महत्या करण्यासाठी आल्याची माहिती विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांना मिळाली. त्यावेळी ओखा – रामेश्वरम एक्स्प्रेस रेल्वे येत होती. रुळांच्या आसपास गर्दी दिसल्याने रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे थांबल्यानंतर तरुणाची समजूत काढून त्याला लोहमार्गापासून दूर नेण्यात आले. त्यानंतर,’घराकडे जातो,’ असे सांगून तो तेथून निघाला आणि काही वेळाने पुन्हा रेल्वेच्या रुळांवर आला. त्यावेळी नगरसोल – नांदेड पॅसेंजर रेल्वे तेथून जाणार होती. हा तरूण रेल्वे येत असताना पुन्हा रेल्वेच्या समोर आला. त्यामुळे रेल्वे थांबली. त्याला या रेल्वेसमोरून हटविले. त्यानंतर काही वेळाने तो मनमाड – काचिगुडा रेल्वेसमोरही आला. काचिगुडा पॅसेंजरही थांबविण्यात आली. त्याला पुन्हा रुळांवरून बाजूला करण्यात आले.
या तरूणाला आत्महत्याचे कारण विचारले असता त्याने, ‘काही मुलांनी त्याच्याकडील साडेचार हजार रुपये व मोबाइल हिसकावून घेतला. अंगाला काचकुरी टाकली. ही गोष्ट आईला सांगू नका. नाहीतर माझी आई जीव देईल,’ असे सांगत होता. तो पुन:पुन्हा रेल्वे रुळांकडे धावत जात होता. श्रीमंत गोर्डे पाटील, शिवानंद वाडकर आणि अन्य नागरिक त्याला त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत होते. या तरुणाने व्हाइटनर प्राशन केले होते. अखेर नागरिकांच्या मदतीने पकडून त्याला उस्मानपुरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रेल्वे क्रॉसिंगजवळ हा गोंधळ किमान एक तास सुरू होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
शहानुरमियॉ उड्डाणपुलाच्या खाली देवानगरी रेल्वे क्रॉसिंगजवळ चाललेल्या या गोंधळानंतर लोहमार्ग पोलिस तरुणाचा शोध घेण्यासाठी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गेले. उस्मानपुरा पोलिसांनी त्या तरुणाचा पत्ता विचारून त्याला सोडून दिल्याची माहिती दिली. यामुळे लोहमार्ग पोलिस त्याचा दुपारपर्यंत शोध घेत होते.