Jammu & Kashmir कालची बातमी : १४४ शिथील केल्यानंतर जुम्माची नमाज शांततेत, काही ठिकाणी किरकोळ अनुचित प्रकार

हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पहिल्याच शुक्रवारी तणावपूर्ण शांततेत राज्यातील हजारो जणांनी मशिदी आणि दर्ग्यात जाऊन नमाज अदा केली. प्रशासनाच्या माहितीनुसार, एकट्या श्रीनगरमध्ये १८,००० नागरिकांनी नमाज अदा केली असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसंच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद केली होती. मात्र, आता तणाव हळूहळू निवळत आहे. जमावबंदी शिथील केली. प्रशासनाने फोन आणि इंटरनेट सेवा अंशत: सुरू केली. यानंतर जम्मू आणि श्रीनगरच्या बाजारात वर्दळ दिसू लागली. शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी अनेक जण मशिदीत गेले. प्रशासनाच्या माहितीनुसार, श्रीनगरमधील जवळपास १८,००० नागरिकांनी नमाज अदा केली. बडगाममध्ये ७५००, अनंतनागमध्ये ११०००, बारामुल्ला, कुलगाम आणि शोपियानमध्ये ४०००हून अधिक नागरिक नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडले. ‘नमाज अदा करण्यापासून कोणी रोखू शकत नाही’, असं श्रीनगरच्या लाल बाजार परिसरात राहणारी नूर जहाँ म्हणाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी आम्हाला थांबवलं नाही. त्यांनी रोखलं असतं तरी आम्ही थांबलो नसतो, असंही ती म्हणाली.
दरम्यान, शुक्रवारी श्रीनगरच्या काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी जवळपास १० हजार निदर्शकांना पांगवण्यासाठी पेलेट गन आणि अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.