सांगली, कोल्हापूरातील पूर परिस्थिती सहाव्या दिवसांनंतर ही कायम, पूरग्रस्तांना मदतीची गरज

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान पूरग्रस्तांना कोणत्याही परिस्थितीत मदतीचा हात देण्यासाठी पुणे विभागातील शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या १०, ११ आणि १२ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे. ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झालं आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते कोलमडलेले, पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशात एकमेकांना हात देत संकटांचा सामना ग्रामस्थ आणि कोल्हापूरकर करत आहेत.