सरकारवर टीकेची झोड : पुराचे पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार तांदूळ आणि गहू, सरकारचा अजब जीआर

गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं अटी घातल्याचं समोर आलं आहे. एखादा परिसर दोन दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली असेल तरच तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येईल, असा ‘जीआर’ सरकारनं काढला आहे. त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यानं ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. त्यात पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ व दहा किलो गहू मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या मदतीसाठी अजब निकष लावण्यात आला आहे. ‘अतिवृष्टी वा पुरामुळं आपत्कालीन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादे क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास…’ असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.
राज्यातील पूरग्रस्तांची ही थट्टा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ‘एक दिवस घर पाण्याखाली गेल्यास एखाद्या कुटुंबाचं नुकसान होत नाही का?,’ अशी विचारणा सरकारला केली जात आहे.
सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला? असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.
‘कर्नाटकच्या यदियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचं सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी यदियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?’ असा सवाल करत अजित पवार यांनी निफाडमधील सभेत सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.