पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची, १६ पैकी ९ मृतदेह लागले हाती , क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने झाली दुर्घटना

पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एनडीआरएफनं दिली. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असताना येथील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 5 महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. तर, काही जण थोडक्यात बचावले आहेत. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुरानं थैमान घातलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हे बचावकार्य सुरू असतानाच पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात आज बोट उलटली.
उलटलेल्या बोटीची क्षमता ३० ते ३२ जणांना वाहून नेण्याची होती. मात्र, पुरातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यावर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते. त्यातून तोल जाऊन हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटी उलटल्यानं एकच हल्लकल्लोळ उडाला. स्थानिक नागरिक बुडालेल्यांना वाचवण्यासाठी धावले. बचाव यंत्रणांच्या मदतीनं स्थानिकांनी काही जणांना बाहेर काढलं. काहींनी झाडांना पकडून व पोहून स्वत:चा जीव वाचवला. तर, इतरांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९ मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.