पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार , वेळ मात्र जाहीर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (गुरुवारी) देशाला संबोधित करणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या भाषणाची वेळ मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी आजच (बुधवारी) देशाला उद्देशून भाषण करणार होते मात्र सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे यात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत जे पाऊल उचलले आहे त्याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत त्यांनी देशाला माहिती दिली होती. त्यानंतर उद्या देशाला उद्देशून होत असलेल्या मोदींच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.