आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी

भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम. एस. शेख यांनी उमरी येथील सामूहिक बलात्काराच्या खटल्यात दोन्ही नराधमांना २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आठ हजार रुपयांचा दंड सुनावला. आनंदा सावंत व कुणाल गायकवाड अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. नराधमांनी आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.
उमरी येथे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली होती. तीन नराधमांनी घरात शिरून महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या डोळ्यांदेखत तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आनंदा महादू सावंत, कुणाल पांडुरंग गायकवाड यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. शहर पोलीस अधीक्षक नुरूल हसन व पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयात या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. प्रत्यक्ष साक्षीदार आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने आनंदा सावंत व कुणाल गायकवाड यांना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व आठ हजार रुपयांचा दंड सुनावला, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.