मोबाईल हिसकावणारा, गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पाच महिन्यांपुर्वी चौघांचे मोबाईल हिसकावून पळ काढलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा साथीदार पसार आहे. विठ्ठल जनार्दन काकडे (वय १९, रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अटक झालेल्या लुटारुचे नाव आहे. त्याला औरंगाबाद क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणासाठी शहरात आलेल्या बबलु रशीद सय्यद (वय २१, रा. मिलकॉर्नर) तसेच सुमिता अरुण कुलकर्णी, गजानन रामप्रसाद अंकर व सचिन त्रिंबकराव मैड हे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी १७ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मोबाईल हिसकावले होते. तेव्हापासून दोघेही पसार झाले होते. त्यांचा तांत्रिक पध्दतीने शोध सुरू होता. बुधवारी काकडेबाबत माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे अमोल देशमुख, जमादार फारुख देशमुख, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, शेख बाबर यांनी लोणार येथे धाव घेतली. काकडेला पकडून त्यांनी एक मोबाईल जप्त केला.