Karnatak Political Drama : येडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, कर्नाटकात अखेर कमळ फुलविले !!

कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल हेही स्पष्ट झाले होते. मात्र, कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर लगेचच सत्तास्थापनेचा दावा न करता येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाशी खल केला. त्यानंतर आज राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला. शपथविधी सोहळ्याला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी कडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात आज येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली आहे. ते राज्याचे २५वे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर येडियुरप्पा यांच्यापुढे बहुमताची अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.