अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारास २० वर्षे सक्तमजुरी आणि ५१ हजाराच्या दंडाची शिक्षा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ओझर येथील तरुणास निफाड कोर्टाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेपैकी ५१ हजार रुपयांची रकम पीडितेस देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.
सुनील वसंत वाघमारे (वय २३, रा. ओझर) असे गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १४ वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली होती. जून २०१३ मध्ये ही घटना झाली होती. शाळकरी असलेल्या पीडित मुलीशी आरोपीशी ओळख झाली होती. कुटुंबातील सदस्य घरात नसल्याची संधी साधत तो मुलीच्या घरी येऊन लग्नाचे आमिष दाखवत होता. याकाळात त्याने मुलीवर बळजबरीने वारंवार बलात्कार केला. ही बाब १ मार्च २०१४ रोजी उघडकीस आली. आपल्या आई समवेत पिंपळगाव येथील द्राक्ष एक्सपोर्ट कंपनीत कामासाठी गेलेल्या मुलीने दुपारी पायात तर सायंकाळी कमरेत चमक भरल्याचे सांगितले. उपचारासाठी आईने मुलीला दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. नववा महिना सुरू असल्याने मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पीडितेच्या आईने नातेवाइकांना सोबत घेत नाशिकला आणले. यावेळी मुलीने सर्व झालेला प्रकार सांगितला. प्रवासातच प्रसुती कळा सुरू झाल्याने तिला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रसुती झाली; मात्र ते बाळ दगावले. बाळ बाळांतीनला घेऊन कुटुंबिय ओझर येथे आले असता आरोपी वाघमारे याने मृत बाळास आपल्या ताब्यात घेऊन परिसरात खड्डा खोदून पुरून विल्हेवाट लावली.
दरम्यान, मुलीचा अज्ञानपणाचा फायदा उचलून हे कृत्य केल्याने पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ओझर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास निरीक्षक सिद्धार्थ वाघ यांनी केला. हा खटला निफाड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या समोर चालला. सरकारी पक्षाच्या वतीने प्रबळ पुरावे सादर करण्यात आल्याने न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत बलात्कार प्रकरणी २० वर्षे जन्मठेप आणि विविध कलमान्वये दंडाची शिक्षा सुनावली.