राजेंद्र जैन विरूध्द फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल व्यापाऱ्यास घातला १ कोटी ४७ लाखांचा गंडा

नामांकीत वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे दागीने लंपास केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र किसनलाल जैन (वय ३९, रा.समर्थनगर) याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपड्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून राजेंद्र जैन याने एका व्यापाऱ्यास १ कोटी ४७ लाख रूपयांचा गंडा घातला असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी मंगळवारी (दि.२३) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोने-चांदीचे व हिरेजडीत दागीने लंपास केले प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद जैन याचा मुख्य व्यवसाय कपड्याचा आहे. जैन याने स्वप्नील बळीराम खंदारे (वय ३२, रा.जयभवानी नगर) यांना कपड्याच्या व्यवसायात गुंतवणूक करा तुम्हाला चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून स्वप्नील खंदारे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खंदारे यांच्याकडून राजेंद्र जैन याने १ ऑक्टोबर ते ६ डिसेंबर २०१८ या काळात निराला बाजार व समर्थनगर येथे वेळावेळी करून १ कोटी ४७ लाख रूपये घेतले होते. दरम्यान, राजेंद्र जैन याने स्वप्नील खंदारे यांनी व्यवसायात गुंतवलेली मुळ रक्कम व परतावा न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी स्वप्नील खंदारे यांच्या तक्रारीवरून राजेंद्र जैन याच्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.