डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी डॉक्टरांविरोधात पुढील आठवड्यात आरोपपत्र

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांविरोधात पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. राजा ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे न्या. डी. एस. नायडू यांनी तिन्ही आरोपींनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या अपिलावरील सुनावणी २३ एप्रिलपर्यंत तहकूब केली.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. याप्रकरणी २८-२९ मेपासून अटकेत असलेल्या तिघींचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने २४ जून रोजी फेटाळले. त्या निर्णयाविरोधात तिघींनी उच्च न्यायालयात हे अपिल केले आहे.