काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती

महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे केंद्रीय काँग्रेस समितीने जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जवाबदारी थोरात यांच्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर शनिवारी रात्री केंद्रीय काँग्रेस कमिटीने पत्रक काढून महाराष्ट्र काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याशिवाय, जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार समितीचे अध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे देण्यात आले आहे.
सुशीलकुमार शिंदे – समन्वय समिती अध्यक्ष
पृथ्वीराज चव्हाण – जाहीरनामा समितीचे अध्यक्ष
नाना पटोले – प्रचार समिती अध्यक्ष
रत्नाकर महाजन – प्रसार समिती अध्यक्ष
राजेंद्र दर्डा – माध्यम समिती अध्यक्ष
शरद रणपिसे – निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्ष
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातल्या या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या समित्यांमध्ये एकाही समितीत अशोक चव्हाण यांचे नाव नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नव्या कार्यकारिणीच्या नेमणुकांमधून काँग्रेसने प्रादेशिक समतोल साधला असल्याचं बोललं जात आहे.