हा तर गोंधळलेला अर्थसंकल्प – जयंत पाटील यांची टीका

‘देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे याची स्पष्टता त्यात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. निर्मला सीतारामन या महागाईबद्दलचे महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील, असे अपेक्षित होते. मात्र, महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही‘, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
गुरुवारी देशाची आर्थिक पाहणी करण्यात आली. मात्र, ‘या पाहाणीत देखील गोलमाल वाटत असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल. तसेच अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात. उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात. मात्र, निर्मला सीतारामन यांना हे माहितीच नाही, असे दिसते. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने बजेटमध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही‘.
शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ – धनंजय मुंडे
दरम्यान केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. परंतु, या अर्थसंकल्पावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ याशिवाय सामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. याशिवाय गेल्या ५ वर्षांचे अपयश झाकण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अनर्थ’संकल्प आहे. पेट्रोल-डिझेलवरील करवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रावर जाणवतील. सोन्यावरील करवाढीने महिलावर्ग नाराज आहे. आयात पुस्तकांवरील करवाढ विद्यार्थी, युवक आणि बुद्धीजीवी वर्गावर अन्यायकारक आहे. बँकांना दिलेला ७० हजार कोटींचा निधी हा अप्रत्यक्षपणे बड्या कर्जबुडव्यांच्या खिशात जाणार आहे. ‘पीपीपी’ मॉडेलद्वारे रेल्वे खाजगीकरणाचा निर्णय रेल्वेसेवा महाग करणार आहे. मध्यमवर्गीयांसाठी आयकराची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. अर्थंसंकल्पातील बहुतांश घोषणा लोकभावनेच्या विरोधात आहेत. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ याशिवाय सामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.’ गेल्या ५ वर्षांचे अपयश झाकण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर केली.