मुंबई , ठाणे , पालघरमध्ये जोरदार पाऊस , येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

कोकणसह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला नाही. रविवारी थोडी उसंत घेतल्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली. पुढील पाच दिवस ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना पाऊस अक्षरश: झोडपून काढणार आहे. येत्या २४ तासांत ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
१ आणि २ जुलै तसेच ४ आणि ५ जुलै रोजी पालघर जिल्ह्यात तर १ आणि २ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ५ जुलैपर्यंतच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरूच राहणार आहे. मुंबईतही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून शहर आणि उपनगरातही संततधार बरसत होती. दुपारी थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मालाड पश्चिम भागात सर्वाधिक १०४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.