Maharashtra विधानसभा २०१९ : राज्यातील काँग्रेस नेत्यांची राहुल गांधींसोबत आज दिल्लीत बैठक

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही काही नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं यासााठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि आगामी विधानसभा निवडणूक या दृष्टिकोनातून चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली होती. नांदेडमधून तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊ केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांना पदावरून दूर केलं जाणार कि पदावर कायम ठेवलं जाणार याचा निकालही या बैठकीत लागेल असे सांगितले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचं काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्षांमध्ये महत्त्वाच्या बैठकी घेण्याचं सत्र सध्या सुरू आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत. अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.