तीन तलाक विधयेक महिलांच्या सन्मानासाठी , काँग्रेसने पाठिंबा देण्याचे मोदींचे आवाहन

समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण यांसारख्या दोन संधी काँग्रेसने दवडल्या. तीन तलाकची तिसरी संधी काँग्रेसपुढे आहे. यासंदर्भातील कायद्याला पाठिंबा देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
देशातील महिला सशक्तीकरणासाठी आतापर्यंत दोन संधी काँग्रेसकडे होत्या. १९५० साली समान नागरी कायदा संसदेत सादर करण्यात आला होता. देशात लिंग समानतेच्यादृष्टीने एक पोषक वातावरण देखील तयार झाले होते. त्यानंतर ३५ वर्षांनी शहाबानो प्रकरण घडले. मात्र काँग्रेसने ही संधी देखील गमावली. तीन तलाक कायद्याच्या माध्यमातून काँग्रेसकडे तिसरी संधी आहे. तीन तलाक संदर्भात सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
महिलांच्या सन्मानासाठी आम्ही विधेयक घेऊन आलो आहोत. याला कोणत्याही संप्रदायाशी जोडण्याची आवश्यकता नाही. शाह बानो प्रकरणावेळी, मुस्लिमांच्या उत्थानाची जबाबदारी काँग्रेसची नाही, जर त्यांना गटारात रहायचं असेल तर राहू द्या, असे धक्कादायक विधान एका काँग्रेस नेत्याने त्यावेळेस केले होते. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, तीन तलाक हा विषय गंभीर आहे. तेदेखील आपल्या देशाचे नागिरक आहेत, त्यांना पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.