संभाजी भिडे आणि धारकऱ्यांना पालखीच्या पुढे पुढे चालण्यास मज्जाव , वारकऱ्यांच्या सूचनेवरून पोलिसांची कारवाई
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहवा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुन्हा एकदा मांडलं. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमतील आणि सर्व पालख्या पुढं गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील.
यापूर्वी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असत. वारकऱ्यांसोबत धारकरीही जात असत. मात्र दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्या पालखी मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गेल्या वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात येण्यास मज्जाव करण्यात आला. यावर्षीही हा विरोध कायम आहे.