काँग्रेसच्या राजकीय कोंडीनंतर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापतीपदी

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हेयांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाने उपसभापतीपदावरील दावा सोडल्यानंतर गोऱ्हे यांची निवड निश्चित मानली जात होती. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. डॉ. गोऱ्हे या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसनं या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या जागी काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांचं नावं विरोधीपक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. तसं पत्रंही काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिलं आहे. मात्र, उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा युतीनं घेतला आणि काँग्रेसची कोंडी झाली. काँग्रेसने नाइलाजाने उपसभापतीपदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
विधानपरिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात आली. दुपारपर्यंत उपसभापतीपदासाठी अर्ज भरण्याची वेळ होतीये. मात्र, जोगेंद्र कवाडे यांनी शर्यतीतून माघार घेतल्याने नीलम गोऱ्हे यांची या पदी बिनविरोध निवड झाली. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.