Mayawati : आता कोणाशीही युती नाही , सर्व निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी या पुढे होणाऱ्या सर्वच छोट्या-मोठ्या निवडणुका बसप स्वबळावर लढवेल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर मायावती यांनी समाजवादी पक्षाशी असलेली युती तोडण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत बसपला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले होते. मायावती यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. बहुजन समाज पक्षाची देशव्यापी बैठक रविवारी लखनऊ येथे सुमारे अडीच तास चालली. यानंतर उशिरा रात्रीपर्यंत राज्यस्तरीय बैठकाही घेण्यात आल्या. या बैठकांना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हजर नव्हते. या बैठकांसंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली वृत्ते पूर्णपणे बरोबर नसल्याचेही मायावतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
समाजवादी पक्षाशी असलेले मतभेद विसरून, तसेच सपाने सन २०१२-१७ दरम्यान घेतलेले बसप आणि दलितविरोधी निर्णय, पदोन्नतीमधील आरक्षणविरोधी कामे, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, असे मुद्दे बाजूला सारून समाजवादी पक्षाने सपशी युतीकरून युतीचा धर्म पाळला, असे मायावती म्हणाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाने दाखवलेल्या वागणुकीमुळे पुढील काळात भारतीय जनता पक्षाला(भाजप) पराभूत करणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. समाजवादी पक्षाची पक्षाची अशीच वागणूक राहिल्यास भाजपला पराभूत करणे शक्य नाही, असेच आपल्याला वाटत असल्याचे मायावती पुढे म्हणाल्या. म्हणूनच पक्ष आणि चळवळीच्या भल्याचा विचार करता भविष्यात छोट्या-मोठ्या निवडणुका स्वबळावरच लढण्याचा पक्षाने निर्णय घेतल्याचे मायावतींनी जाहीर केले.