Loksabha : तिसऱ्यांदा तिहेरी तलाकविधेयकाला काँग्रेस आणि एमआयएमचा कडवा विरोध, महिलांच्या मंदिर प्रवेशासंदर्भातही कायदा करण्याची मागणी

भाजप सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत तिहेरी तलाकविधेयक लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला काँग्रेस आणि एमआयएमने कडवा विरोध केला असून शबरीमलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक ( तलाक-ए-बिद्दत) असंविधानिक असल्याचं सांगत केंद्र सरकारला याबाबत कायदा पारित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने दोनदा ‘मुस्लिम महिला संरक्षण विधेयक ‘ संसदेत मांडले होते. पण राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नसल्यामुळे ते पास होऊ शकले नाही.
विरोधकांनी सुचवलेले बदल या विधेयकात समाविष्ट करून आज पुन्हा एकदा हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या विधेयकाला कडवा विरोध केला आहे. हे विधेयक फक्त मुस्लिम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सर्व धर्माच्या महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने एक कायदा करावा अशी मागणी शशी थरूर यांनी केली आहे. तसंच तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारे कलम आपल्याला अमान्य असल्याचंही थरूर यांनी सांगितलं.भाजप सरकार मुस्लिम समाजाला लक्ष करत असल्याचा आरोपही थरूर यांनी केला आहे. तसंच सरकारच्या या विधेयकामागील हेतूवरच काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
तर एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसींनी हे विधेयक मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणारं असल्याचा आरोप केला आहे. तिहेरी तलाक विधेयक संविधानाच्या कलम १४ आणि कलम १५चे उल्लंघन करणारे असल्याचं सांगत त्यांनी सरकारला लक्ष केलं. त्याचवेळी शबरीमला प्रकरणी केंद्र सरकार गप्प का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यानंतर विरोधकांनी शबरीमलाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. सरकारचा विरोध करणाऱ्या घोषणा देत विरोधकांनी संसदेत गोंधळ केला. महिलांच्या मंदिर प्रवेशासंदर्भातही कायदा करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली. विधेयक सादर होण्यापूर्वी बिहारमधील चमकी तापाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत गोंधळ केला होता.
मुस्लिम महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक मांडले असल्याची माहिती कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. हे विधेयक राजकीय किंवा धार्मिक नसून मुस्लिम महिलांचे सबलीकरण करणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं.