नवा भारत घडविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या या प्रयत्नांना साथ द्यावी : राष्ट्रपती

‘तिहेरी तलाक, हलाला यांसारख्या कुप्रथांविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या या प्रयत्नांना साथ द्यावी,’ असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. नवनिर्वाचित लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला १७ जून रोजी सुरुवात झाली. खासदारांचे शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आज राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं.
या भाषणात कोविंद यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या चांगल्या कामांचा पाढा वाचला, तसंच भविष्यातील योजनांचा आराखडाही सादर केला. रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील ओळींनी भाषणाची सुरुवात करताना कोविंद यांनी नव्या भारताबद्दलचा विश्वास जागवला. ‘जिथे जनता भयमुक्त असेल आणि नागरिकांची मान अभिमानानं ताठ असेल, असा रविंद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातील भारत वास्तवात आणायचा आहे. त्या दृष्टीनं आपण वाटचाल करत आहोत, असं ते म्हणाले. सरकारपुढील आव्हानांचा लेखाजोखाही त्यांनी आपल्या भाषणातून मांडला.
जलशक्ती योजनेतून पाण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी पोषक निर्णय घेण्यावर सरकारचा भर असेल, असंही कोविंद यांनी स्पष्ट केलं.