बहुतांश पक्षांचा ‘एक देश-एक निवडणूक’ ला पाठिंबा, बैठकीत २४ पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग : राजनाथ सिंह

‘एक देश, एक निवडणूक’ या विषयासाठी एक समिती बनवण्यात येईल. ही समिती या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व बाजूंचा विचार करून आपला अहवाल देईल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय बैठकीत झाला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, ‘या बैठकीत २४ पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. जवळपास सर्व पक्षांनी एक देश- एक निवडणूक मुद्द्याला पाठिंबा दिला.’ ‘सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ. जर एखाद्या पक्षाच्या विचारात मतभेद असेल तरीही त्याचाही सन्मानच केला जाईल,’ असं राजनाथ सिंह म्हणाले.
सरकारकडून ४० पक्षांना या बैठकीस बोलावण्यात आलं होतं. काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेससारख्या अनेक पक्षांनी या बैठकीस गैरहजेरी लावली. राजनाथ सिंह म्हणाले, ‘बहुतांश सदस्यांनी एक देश-एक निवडणूक मुद्द्याला आपला पाठिंबा दर्शवला. सीपीआय-सीपीएमकडून विचारांमध्ये थोडा मतभेद होता. त्यांची शंका याच्या अंमलबजावणीविषयी होती. पण त्यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेचा विरोध केला नाही. ‘ या सर्व पक्षांशी चर्चा करून अहवाल देण्याचं काम एक समिती करेल. पंतप्रधान स्वत: ही समिती गठीत करणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘बैठकीत मांडलेले मुद्दे सरकारचा अजेंडा नव्हे, तर देशाचा अजेंडा आहे.’