आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू , पुढच्या वर्धापन दिनी सेनेचा मुख्यमंत्री , कामाला लागा : उद्धव ठाकरे

शिवसेना ही स्वतंत्रबाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा आपल्याला भगवी करून सोडायची आहे. पुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल त्यामुळे कामाला लागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेला पुन्हा प्रारंभ होईल असे चित्र आहे .
शिवसेनेचा आज ५३वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दैनिक ‘सामना’मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेने हा निर्धार व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया!,’ असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.