तांत्रिकासोबत शरीरसंबंधांना नकार दिला म्हणून पतीने पत्नीला मुलासमोर बुडवून मारले

तांत्रिकासोबत शरीरसंबंध ठेवायला नकार दिला म्हणून ३२ वर्षीय महिलेला तिच्या नवऱ्याने नदीत बुडवून मारले. उत्तर प्रदेशात अलीगडमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा नवरा आणि तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
या जोडप्याचा मुलगा गुन्ह्याचा साक्षीदार आहे. आरोपी मानपाल जेव्हा पत्नीला पाण्यात बुडवून मारत होता तेव्हा त्यांचा मुलगा मदतीसाठी आरडाओरडा करत होता. आईला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तुझ्याबरोबर सुद्धा असेच होईल अशी वडिलांनी मुलाला धमकी दिली असा आरोप महिलेच्या भावाने केला आहे.
महिलेचा भाऊ राजेश कुमारने दादोन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. घटनेच्या दोन दिवसआधी बहिणीने आपल्याला फोन करुन हस्तक्षेप करण्यास सांगितले होते असे राजेश कुमारने पोलिसांना सांगितले. मानपालने पत्नीची समजूत घातली व तिला नदीकाठी घेऊन गेला तिथे त्याने तिला नदीत ढकलून दिले असा राजेश कुमारचा आरोप आहे. संतदास दुर्गा दास असे तांत्रिकाचे नाव आहे. पत्नीला मारल्यानंतर मानपाल आणि तांत्रिक दोघेही शेजारच्या बदायू जिल्ह्यात पळून गेले होते.