Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘सफदरजंग रुग्णालयावर विश्वास उरला नाही’; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, हायकोर्टात धाव

Advertisements
Advertisements
Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती आणि उपचारांबाबत त्यांच्या पत्नी गीतांजलि जे. आंग्मो यांनी सफदरजंग सरकारी रुग्णालय आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पतीला खासगी रुग्णालयात हलविण्याची परवानगी नाकारली जात असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे.

Advertisements

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील माझा विश्वास उरलेला नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाने सोनम वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी 2.9 असल्याचे सांगितले आणि ती जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचे नमूद केले. मात्र, रुग्णालयाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद न करता केवळ “पोटॅशियमची पातळी कमी होत आहे” एवढीच माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisements
Advertisements

त्यांनी पुढे दावा केला की, जवळपास १० तासांच्या प्रतीक्षेनंतर आणि वारंवार विनंती केल्यानंतर रात्री १०.३० वाजता स्वतंत्र प्रयोगशाळेत रक्ताचा नमुना तपासण्याची परवानगी मिळाली. त्या तपासणीत पोटॅशियमची पातळी 3.5 आढळली, जी सामान्य श्रेणीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://x.com/i/status/2078698266431279120

पत्नीच्या आरोपानुसार, अनेकदा विनंती करूनही सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज दिला जात नसून, त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यासही परवानगी दिली जात नाही. तसेच रुग्णालयाच्या मजल्यावर सुमारे ३० पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालयात १०० हून अधिक पोलीस तैनात असल्याचा दावा करत, ही वैद्यकीय सेवा नसून “बेकायदेशीर नजरकैद” असल्याचा आरोप त्यांनी केला.

“सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीला काहीही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करून, सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलविण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. “आपल्या प्रिय व्यक्तीवर कुठे उपचार व्हावेत, हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेविरुद्ध लढावे लागू नये,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रुग्णालय प्रशासन किंवा दिल्ली प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!