दीक्षाभूमीवर नतमस्तक झाले पंतप्रधान मोदी …. बाबासाहेबांच्या विचारांची केली आठवण !!

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळपासून मोदींचा नागपूर दौरा सुरु झाला असून ते दिवसभरात विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. रविवारी मोदींच स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. नागपूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी 8 वर्षांनी दीक्षाभूमीला भेट दिली.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन करून त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन केले. तसेच दीक्षाभूमीच्या पवित्र स्तूपांमध्ये बुद्ध वंदना केली. यापूर्वी 2017 रोजी नरेंद्र मोदी नागपूरच्या दीक्षाभूमीला आले होते. 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यानंतर आठ वर्षानंतर मोदीजी दीक्षाभूमीवर आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, एड. आनंद फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी मध्यवर्ती स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केे. त्यानंतर तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बुद्ध वंदनाही ग्रहण केली. पंतप्रधान १५ मिनिटे दीक्षाभूमीवर होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि गोल्डन कलरमध्ये दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आले
दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो : पंतप्रधान
बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. बाबासाहेबांची सामाजिक समरसता, समता आणि न्यायाची तत्त्वे या पवित्र स्थानाच्या वातावरणात सहज अनुभवता येतात.दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंना समान हक्क आणि न्यायाची तरतूद करून पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते.मला पूर्ण विश्वास आहे की या अमर कालात आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी आणि मूल्यांचे पालन करू.देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली असेल.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली आणि महत्त्वाचा संदेश दिला. ही भूमी अतिशय पवित्र आहे. पहिली संघभूमी आणि दुसरी दीक्षाभूमी हे दोन्ही ठिकाणी विचारांचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर इतर विचारधारांचाही सन्मान व्हावा, यासाठी येथे आलो आहे. पंतप्रधान वारंवार येथे यावे आणि सामाजिक समरसतेचा संदेश द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समानतेचा संदेश दिला आहे, त्याच पद्धतीने मोदींनीही तोच संदेश दिला आहे. त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.” असे दीक्षाभूमीचे सचिव राजेंद्र गवई यांनी सांगितले.