पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते…., भाजप खासदाराची मुक्ताफळे !!

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरुन सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावरून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरुन सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार झाला. तर दुसरीकडे ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे. भाजप खासदाराच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेत्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत वादग्रस्त वक्तव्य केली होती. आता आणखी भाजपचा आणखी एक खासदार संसदेत बरळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, असं वक्तव्य भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी केलंय. त्यानंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, त्यांचं हे वक्तव्य संसेदेच्या कामकाजातून काढून टाकण्याची नामुष्की उपसभापतींवर आली आहे.
https://x.com/INCIndia/status/1901838471481737669?
नरेंद्र मोदी पूर्वीच्या जन्मी शिवाजी महाराज होते…..
खासदार प्रदीप पुरोहित म्हणाले, मी ज्या क्षेत्रातून येतो. तो एक डोंगरी भाग आहे. तिथे गिरीजाबाबा नावाचे एक संत राहातात. त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी योग्य सांगितलं होतं. ते म्हणाले की, आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा पूर्वजन्म जो होता, त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आता त्यांचा दुसरा जन्म नरेंद्र मोदी म्हणून झालाय. त्यामुळे तेच भारताला सर्वांत शक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान भाजप खासदार पुरोहित यांच्या या विधानाला ठाकरे गटासह, काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंती केली. त्यानंतर सभापती दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या शब्दांची चौकशी करून त्यांना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान
वर्षा गायकवाड म्हणाल्या, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका…शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.
https://x.com/rautsanjay61/status/1901870734714274152?
असे लोक कुठून पैदा होतात? संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले, हे महाशय संसदेत संसदेत बोलत आहेत. नरेंद्र मोदींचा पूर्वजन्म जो होता, त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज होते, असं म्हणत आहेत. यांची भाजपा खऱ्या शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांची शिवाजी केवळ नरेंद्र मोदी आहेत. असे लोक कुठून पैदा होतात? भाजपने शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. माफी मागितली पाहिजे.
पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असं विधान भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी केलं. भाजप खासदाराने लोकसभेत बोलताना एका साधूला भेटल्याचे सांगितले. एका साधूने मला सांगितले की पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पंतप्रधान मोदी हे पूर्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते त्यामुळे ते संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी काम करत आहे.
विरोधकांकडून टीकास्त्र
“भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. प्रदीप पुरोहित म्हणतात- नरेंद्र मोदी हे त्यांच्या मागील जन्मी शिवाजी महाराज होते. या पापाबद्दल भाजप आणि नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. प्रदीप पुरोहित यांना निलंबित करण्यात यावे,” अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर शिवरायांचा वारंवार अपमान करणार्या भाजपचा जाहीर निषेध, असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. “हे भाजपवाले खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत. त्यांचे शिवाजी फक्त मोदी आहेत. हे लोक कुठून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी,” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आगीत तेल ओतण्याचे काम….
एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून मुद्दाम वाद पेटवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. समाजसमाजात तेढ निर्माण करण्यासाठी इतिहासातील गढे मुडदे बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता पुरोहित यांच्या वक्तव्याने या आगीत तेल ओतल्या गेले आहे. असे वाद समाजाला परवडणारे नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर हा वाद आताच कसा पेटवण्यात येत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.