IndiaWorldNewsUpdate : पंतप्रधान भारतात पोहोचत नाहीत तोच अमेरिकेचे भारताला दोन जबर धक्के !!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावरून भारतात पोहोचत नाहीत तोच अमेरिकेने दोन धक्के भारताला दिले आहेत . त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आलेल्या नागरिकांना हातात हातकड्या आणि पायात बेड्या घालून लष्करी विमानातून सोडण्यात आले होते. यावरून भारताने आपली नाराजी अमेरिकन सरकारला कळवली होती तर देशातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानंतर तरी अमेरिका भारतीय नागरिकांशी मानवतेने वागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून आजही ११६ जणांना पुन्हा तसेच हात,पाय बांधून भारतात पाठविण्यात आले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार अमेरिकी सैन्याचे सी १७ विमान शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमृतसर विमानतळावर उतरले. या विमानात पंजाबचे ६५, हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, युपी-महाराष्ट्र व राजस्थानचे दोन-दोन, हिमाचल, गोवा, जम्मू काश्मीरचा प्रत्येकी एक व्यक्ती आहे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनिवारी रात्री आलेल्या या ११६ प्रवाशांना गेल्यावेळसारखीच वागणूक देण्यात आली आहे. विमानातून उतरण्यापूर्वी या बेड्या काढण्यात आल्या. महिला आणि मुलांना मात्र मोकळे ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये शीख लोकही होते, परंतु , शीख तरुणांच्या डोक्यावर पगड्या काढून टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे काहीजण मोठमोठ्याने ओरडून रडत होते.
भारतीयांना पुन्हा एलियन सारखी वागणूक…!!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींची चर्चा झाल्याने यावेळी भारतीयांना अशी वागणूक मिळणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. परंतू, अमेरिकेने पुन्हा एकदा भारतीयांना एलियन सारखी वागणूक दिली आहे. तसेच कोणत्याही देशाचा नागरिक अमेरिकेत घुसला तर त्याला हीच वागणूक मिळणार असल्याचे देखील भारतासह सर्व देशांना स्पष्ट केले आहे.
अमृतसरला आलेले हे दुसरे विमान होते, आज १६ फेब्रुवारीला तिसरे विमान या अवैध भारतीय प्रवाशांनी भरून पाठविण्यात येणार आहे. यामध्ये १५७ प्रवासी असण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री या प्रवाशांसाठी बिझनेस लाऊंजमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. ते सायंकाळी चार वाजल्यापासूनच विमानतळावर ठाण मांडून बसलेले होते.
भारताला दुसरा दणका ….
या शिवाय भारताला अमेरिकेने आणखी एक धक्का दिला. हा धक्का म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहयोगी एलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील शासकीय कार्यक्षमतेच्या विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच मस्क यांनी पीएम मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना सहकुटुंब भेट घेतली होती. त्यांना मायदेशात येऊन 48 तास होत नसतानाच त्यांनी भारताला मिळणारा निधी रद्द केला आहे. DOGE ने पोस्ट केलेली यादी प्रसिद्ध केली आहे यामध्ये विभागाने रद्द केलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश आहे. या यादीमध्ये भारतातील मतदारांच्या सहभागासाठी निधीचाही समावेश आहे. DOGE ने लिहिले की अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा हा सर्व खर्च रद्द करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती
DOGE प्रमुख एलोन मस्क यांनी गुरुवारी, 13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. मस्क पंतप्रधानांना भेटण्यासाठी ब्लेअर हाऊसमध्ये पोहोचले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इनोव्हेशन, स्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याशिवाय भारतीय आणि अमेरिकन संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्यावर मस्क आणि मोदी यांच्यात चर्चा झाली.
पीएम मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर इलॉन मस्कसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, ‘एलॉन मस्क यांच्यासोबत छान भेट झाली. आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये मस्क अत्यंत उत्कट असलेल्या मुद्द्यांचा समावेश आहे. जसे की जागा, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नाविन्य. मी त्यांच्याशी ‘किमान सरकार, कमाल शासन’ याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांबद्दल बोललो.
दरम्यान मस्कचा विभाग DOGE मधील सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या दिशेने काम करत आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या या विभागाने सरकारी खर्च वेगाने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेतही एलोन मस्क यांच्याकडून घेण्यात येणा-या निर्णयाच्या विरोधात गदारोळ उठला असून त्यांच्या विरोधात 14 राज्यांनी न्यायालयात खटला दखल केला आहे. मुळात एलोन मस्क यांची नियुक्ती घटनाबाह्य असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या राज्यांनी केली आहे.
या योजनांसाठी थांबवण्यात आला निधी….
मस्कच्या नेतृत्वाखालील विभागाने उघड केले की करदात्यांनी निधी दिलेले इतर प्रकल्प देखील बंद करण्यात आले आहेत, ज्यात खालील योजनांचा समावेश आहे:
आशियातील शिक्षण परिणाम सुधारण्यासाठी $47 दशलक्ष
लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण केंद्रासाठी $४० दशलक्ष
प्राग सिव्हिल सोसायटी सेंटरला $३२ दशलक्ष
मोल्दोव्हामध्ये समावेशक आणि सहभागी राजकीय प्रक्रियेला चालना देण्यासाठी $२२ दशलक्ष.
नेपाळमध्ये वित्तीय संघराज्यासाठी २० दशलक्ष डॉलर्स
नेपाळमधील जैवविविधता संवर्धनासाठी १९ दशलक्ष डॉलर्स
मालीमध्ये सामाजिक एकतेसाठी १४ दशलक्ष डॉलर्स
सर्बियामध्ये सार्वजनिक खरेदी सुधारण्यासाठी १४ दशलक्ष डॉलर्स
मोझांबिकला स्वेच्छेने वैद्यकीय पुरुष खतना करण्यासाठी $10 दशलक्ष मिळतील
उद्योग-चालित कौशल्ये असलेल्या कंबोडियन तरुणांचा एक गट विकसित करण्यासाठी यूसी बर्कलीला $9.7 दशलक्ष बक्षीस दिले जाईल.
दक्षिण आफ्रिकेतील समावेशक लोकशाहीसाठी $२.५ दशलक्ष
कंबोडियामध्ये स्वतंत्र आवाजांना बळकटी देण्यासाठी २.३ दशलक्ष डॉलर्स
कोसोवो, रोमा, अश्काली आणि इजिप्तमधील उपेक्षित समुदायांमध्ये सामाजिक-आर्थिक एकता वाढविण्यासाठी शाश्वत पुनर्वापर मॉडेल्स
विकसित करण्यासाठी $२ दशलक्ष
लायबेरियामध्ये मतदारांचा विश्वास निर्माण करण्यासाठी १.५ दशलक्ष डॉलर्स
मस्कच्या विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की मोठ्या प्रमाणात रद्दीकरण हे सरकारी कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि करदात्यांच्या पैशाचा वापर संशयास्पद परदेशी राजकीय उपक्रमांवर खर्च होऊ नये यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
भाजप ची प्रतिक्रिया….
भाजपने आता रद्द केलेल्या निधीचे वर्णन भारताच्या निवडणूक प्रक्रियेत “बाह्य हस्तक्षेप” असे केले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मतदारांसाठी २१ दशलक्ष डॉलर्स? हे स्पष्टपणे भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाहेरील हस्तक्षेप आहे. याचा फायदा कोणाला होईल? निश्चितच सत्ताधारी पक्षाला नाही!”
ते पुढे म्हणाले की, परदेशी शक्ती भारतीय संस्थांमध्ये पद्धतशीर घुसखोरी करत आहेत, विशेषतः अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनच्या माध्यमातून, जागतिक संस्थांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.