India-WorldNewsUpdate : अमेरिकेने भारताला दिली ४८७ भारतीयांच्या संभाव्य हद्दपारीची माहिती , हातात बेड्या घालून भारतात पाठवलेल्या १०४ नागिकांवरून संताप….

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. यावर बोलताना , भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) सांगितले की, अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे ज्यांना हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आधी अमेरिकेने १०४ भारतीयांना मायदेशी पाठवले आहे. त्यांना ज्या प्रकारे अमेरिकन लष्कराच्या विमानातून भारतात पाठवण्यात आले त्यावरून भारतात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान यावरून भारताने केवळ चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे आढळून आलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली.
अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या हद्दपारीबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “परराष्ट्रमंत्र्यांनी निर्बंधांच्या वापराशी संबंधित मानक कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली, ज्याबद्दल आम्हाला इमिग्रेशन आणि कस्टम्स अंमलबजावणीसह अमेरिकन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी याकडे लक्ष वेधले की हे बऱ्याच काळापासून प्रचलित आहे.
गैरवापराच्या मुद्द्यावर सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “हा मुद्दा उपस्थित करणे हा एक वैध मुद्दा आहे आणि आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांना यावर भर देत राहू की निर्वासितांना कोणताही गैर वागणूक देऊ नये. आमच्या लक्षात येणारे गैरवापराचे कोणतेही प्रकरण आम्ही उपस्थित करत राहू. बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या अंतर्निहित परिसंस्थेविरुद्ध संपूर्ण प्रणालीवर कारवाई केली पाहिजे.”
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांच्या निवेदनात हे म्हटले होते
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांना राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले होते की, “काल १०४ लोक भारतात परतले आहेत. आम्ही त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. हा एक नवीन मुद्दा आहे असे आपण समजू नये. हा एक असा मुद्दा आहे जो यापूर्वीही घडला आहे.”
ते पुढे म्हणाले होते की, “अधिकाऱ्यांना परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत (अमेरिकेतून हद्दपार झालेल्या भारतीय) बसून ते अमेरिकेत कसे गेले, एजंट कोण होता आणि हे पुन्हा घडू नये म्हणून आपण कशी खबरदारी घेऊ शकतो हे जाणून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
राज्यसभेत एस. जयशंकर यांनी काय स्पष्ट केले ?
राज्यसभेत एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत पाठवण्यात आले आहे. अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी त्यांना यापूर्वी झालेल्या अशा कारवाईची आकडेवारीही सांगितली. ते म्हणाले की, “२०१२ पासून, अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येत आहे. ही कारवाई करत असत्याना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात. टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात.”
बुधवारी, अमेरिकेत राहणाऱ्या १०४ अवैध भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “परत येणाऱ्या निर्वासितांना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागू नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत.” जयशंकर पुढे म्हणाले की, “जर नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे.”