MaharashtraPoliticalUpdate : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदे यांची आगपाखड , नेमके काय म्हणाले शिंदे ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टोकाची राजकीय टीपण्णी करणाऱ्या ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवरून सध्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं नाही, याउलट गद्दार आणि घटनाबाह्य सरकार म्हणत टीकाच केल्याचं दिसून आलं. मात्र, ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन केल्याने अनेकांनी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी तीनवेळा फडणवीसांची भेट घेतली असून आजही त्यांनी वरळी मतदारसंघातील विषयांसह विविध मुदद्यांवर चर्चा केली. आता, या भेटीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
यावर बोलताना , जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे-फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया दिली. तसेच, सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जातं मी पहिल्यांदा बघितली. लोकांनी ज्यांना झिडकारलं, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. तुम लढो हम कपडा सांभालते है, तसं तुम लढो हम बुके देके आते है.. असं मी एकदा म्हटलं होतं, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. संस्कृती, संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने शिकवले आहेत. शिव्या, शापाशिवाय ते काय बोलत नव्हते. पहिलं सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलेलं नाही. तर, आम्ही आरोपांना आरोपांनी उत्तर दिल नाही, आम्ही कामातून उत्तर दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात वडिल उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले होते. त्यानंतर, आता तिसऱ्यांदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विविध विषयावर संवाद साधला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या गृहनिर्माण खात्यासंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच गाऱ्हाणं मांडल. त्यामुळे, एकनाथ शिंदेंना न भेटता पोलिसांच्या घरांसंदर्भातही आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना विनंती केली. त्यामुळे, ठाकरे-फडणवीस भेटीवर शिंदे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.