Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन केले , सोनाथ दलित असल्यानेच पोलिसांनी कोठडीत हत्या केली : राहुल गांधी

Spread the love

परभणी : परभणी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीकाची विटंबना झाल्यामुळे उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) भेट घेतली आणि सांत्वन केले. “सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन विधानसभेत दिले”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंददरम्यान हिंसाचार झाला. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी खासदार राहल गांधी हे परभणीत आले होते.

यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. संजय जाधव, माजी आ. सुरेश वरपूडकर, सिद्धार्थ हत्तिअंबिरे भगवान वाघमारे यांच्यासह राज्यातून आलेले अनेक नेते उपस्थित होते. गांधी यांनी तब्बल २० ते २५ मिनिटे या सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “मी सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी (सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय) पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखविले.”

“ही ९९ टक्के नाही, तर शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री पोलिसांना मेसेज देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

तो संविधानाचे तो रक्षण करीत होता….

“या तरुणाला यामुळे मारण्यात आलं, कारण तो दलित होता. आणि तो संविधानाचे तो रक्षण करीत होता. आरएसएसची विचारधारा ही संविधान नष्ट करण्याची विचारधारा आहे. याची चौकशी करावी, यात संबंधितांना शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार गांधी म्हणाले, “हा कोणताही राजकारण करण्याचा विषय नाही. हा न्याय मिळवून देण्याचा विषय आहे. याला संघाची विचारधारा जबाबदार आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन दिले, त्यामुळे याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

परभणी जिल्ह्यात १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिलं होतं.

काय म्हटलं आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने?

आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत सोमनाथच्या आईने माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असं म्हटलं आहे. माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार करण्यात आलं. माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे प्राण घेतले. माझा मुलगा मेला त्यानंतर पाच दिवसांनी मला कळवलं. मला काहीही सांगितलं नव्हतं. मुलगा जिवंत असताना मला पोलिसांनी फोन केला नाही. मला सांगण्यात आलं की सोमनाथ हा तुमचा मुलगा त्याचा मृत्यू झाला आहे, त्याची बॉडी घेऊन जा. हे मला जे सांगितलं तेच आम्ही राहुल गांधींना सांगितलं. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही सोमनाथच्या आईने केली. आम्ही राहुल गांधींना आत्तापर्यंत काय घडलं ते सगळं सांगितलं. सोमनाथ सूर्यवंशी हृदय विकाराच्या झटक्याने गेला असं मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतात? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला असंही सूर्यवंशी कुटुंबाने विचारलं.

मुख्यमंत्र्‍यांवर हक्कभंग आणणार

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सोमनाथ सोमवंशी यांना दम्याची बिमारी होती आणि त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. पण, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत, विधानसभेची त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले. इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम बीजेपी करत आहे, ते या ठिकाणी दिसलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

न्यायालयीन चौकशीसाठी समिती स्थापन करणार

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!