लव्ह जिहाद नंतर आता वोट जिहाद वर भाजपचा जोर , ‘बंटेंगे तो कटेंगे..’ योगींच्या घोषणेचे लागले मोठे होर्डिंग्ज….

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा आपला कट्टर हिंदुत्वाचा नारा महाराष्ट्रात देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केली आहे . त्याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय मतदारांना हिंदुत्वाच्या नावाखाली साद घालण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘बंटेंगे तो कटेंगे..’ ही घोषणा चर्चेत आणली जात आहे. मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुख्यमंत्री योगींच्या छायाचित्रासह या घोषणेचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते विश्वबंधू राय यांनी हे होर्डिंग्ज लावून मुंबईतील वातावरण तापवले आहे.
विश्वबंधू राय हे महाराष्ट्र भाजप युनिटचे नेते आहेत. त्यांनी मुंबईतील ‘बंटेंगे तो कटेंगे..’ ‘च्या होर्डिंगवर योगी संदेश असे लिहून योगी आदित्यनाथ यांचे कट आउट लावले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हिन्दू मतांच्या विभाजनाचे राजकारण करत असून त्यांच्या राजकीय खेळीला त्यांनी त्यांच्या होर्डिंग्जद्वारे प्रत्युत्तर दिले असल्याचे भाजपने म्हटाले आहे. मुंबईत उत्तर भारतातील लोकही मोठ्या संख्येने राहतात. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसू शकतो. असे भाजपला वाटते.
लव्ह जिहाद नंतर आता वोट जिहादची चर्चा ….
यादरम्यान भाजप नेत्याने व्होट जिहादचाही उल्लेख केला आणि ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद कसा केला गेला याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच तपशीलवार खुलासा केला आहे. त्याचाही फटका भाजपला सहन करावा लागला. या निवडणुकीतही व्होट जिहादची तयारी सुरू आहे. आता याचे उत्तर द्यायचे आहे. हरियाणाच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे लोकांनी एकजूट दाखवून भाजपला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भाजपला साथ देईल.
सीएम योगींचा प्रभाव महाराष्ट्रात पोहोचला! या घोषणेचा प्रतिध्वनी ऐकू आला, त्याचीच पुनरावृत्ती पीएम मोदींनीही केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा कानपूरमध्ये जाहीर सभेत हे वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा निवडणुकीत ही घोषणा पुन्हा केली होती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही असेच काहीसे बोलून जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले होते. आगामी काळात भाजप हा मुद्दा अधिक जोरकसपणे मांडू शकते, असे मानले जात आहे.