Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : आज दिवसभरात : उमेदवार याद्या घोषित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोर बैठका वाढल्या….

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांच्या राजकीय हालचाली वाढल्या असून उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्यावर भर दिल जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जागावाटपासाठी आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेसच्या छानणी समितीची आज बैठक होत असून काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत महाविकास आघाडीतील जागावाटपानुसार वाट्याला आलेल्या 84 जागांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये जवळपास जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडीमधील मुंबईमधील 90 टक्के जागांची चर्चा पूर्ण झाली आहे. तीन जागांचा तिढा हा उद्यापर्यंत सोडवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटच मोठा पक्ष राहणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. मुंबईमधील जागावाटपाच्या बैठकीमध्ये 36 पैकी 33 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचे एकमत झालं आहे. येत्या एक ते दोन दिवसात जागावाटप आणि काँग्रेसची पहिली उमेदवारांची जाहीर येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी काँग्रेसची 84 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती दिली. दिल्लीमधील हिमाचल भवनमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासह बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, वर्षा गायकवाड पोहोचले आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची  बैठक

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक आज संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणार आहे. या बैठकीला पीएम मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सीईसी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!