Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नंदुरबार येथे एका धार्मिक रॅलीवर दगडफेक, घरे आणि दोन दुचाकींना आग लावण्याचा प्रयत्न

Spread the love

नंदुरबार  : नंदुरबार येथे एका धार्मिक रॅलीवर दगडफेक करण्यात आली. ज्यानंतर शहरातील माळीवाडा, इलाही चौक आणि मच्छी बाजार या परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली. यावेळी उपद्रव करणाऱ्यांनी काही वाहनांचीही तोडफोड केली. एवढंच नाही तीन घरं आणि दोन दुचाकींना आग लावण्याचा प्रयत्नही झाला. मात्र परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. पोलिसांना तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

नंदुरबारमध्ये धार्मिक रॅली सुरु असताना त्यावर दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे दोन गटांमध्ये वाद सुरु झाला आणि त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला शांतपणे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर पोलिसांना अश्रूधुराचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे  आवाहन

नंदुरबारमध्ये  जी परिस्थिती निर्माण झाली ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. या घटनेचा परिणाम शहरांतील इतर भागातही झाल्याचं दिसून आलं. नागरिकांची धावपळ उडाली, तसंच शाळाही सोडून देण्यात आल्या. या घटनेनंतर काही अफवा पसरल्याने या घटना घडल्या. पोलीस अधीक्षकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे.

नंदुरबारमध्ये  धार्मिक रॅलीच्या दरम्यान दगडफेक झाली आणि दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे शहरातला कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो निर्माण झाला. आता परिस्थिती शांत आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही प्रकराचा आक्षेपार्ह व्हिडीओ, आक्षेपार्ह अफवा पसरवू नये आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये. कुणी अफवा पसरवल्या तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दगडफेकीच्या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. सगळ्यांना मी शांततेचं आवाहन करतो असं पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी म्हटलं आहे.

विजय कुमार गावित यांचे आवाहन

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनीही नंदुरबारच्या घटनेप्रकरणी आवाहन केलं आहे. कुठल्याही अफवा कुणीही पसरवू नये. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नंदुरबार  हे शांतताप्रिय शहर आहे, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. तसंच शांतता कशी नांदेल तो प्रयत्न करावा ही माझी विनंती आहे. असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!