धक्कादायक : बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला…

बडोदा : बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला. त्यामुळे एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे रस्ता खराब झाल्याचा संशय आहे. रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की, त्याची पुनर्बांधणी होण्यास अनेक महिने लागू शकतात. पाऊस थांबल्यानंतरच रस्तेबांधणीचे काम सुरू होणार आहे. येथील काम लवकर मार्गी लावण्याचे स्थानिक आमदाराने सांगितले आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील सिंधुदूर्गमध्ये आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या रस्त्याबाबत हे खळबळजनक वृत्त आहे. बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱा रस्ता पुराच्या पाण्यात तुटून गेला आहे. यामुळे एका बाजुने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे 2013 मध्येच त्यांनी या पुतळ्याची पायाभरणी केली होती आणि पंतप्रधान झाल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी देशाला समर्पित केले. जगातील सर्वात उंच पुतळा अंदाजे 2989 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला.
स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या
2018 मध्ये 4.53 लाख
2019 मध्ये 27.45 लाख
2020 मध्ये 12.81 लाख (कोविड वेळ)
2021 मध्ये 34.29 लाख
2022 मध्ये 41.32 लाख
2023 मध्ये 31.92 लाख
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2010 मध्ये नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 2018 मध्ये हा पुतळा देशाला समर्पित करण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उभारणीनंतर एकापाठोपाठ एक असे २६ नवीन प्रकल्प उभारले गेले आणि केवड्याचेही आता एकता नगर झाले आहे.
अतिवृष्टीमुळे १८ जिल्ह्यांत पूरस्थिती
गुजरातमधील 13 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे १८ जिल्ह्यांत पूरस्थिती आली आहे. 5 जिल्ह्यांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. राज्यात गेल्या 3 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.