खा. प्राणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला मराठा , धनगर आरक्षणाचा प्रश्न , सरकारवर केला हा आरोप ..

नवी दिल्ली : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरक्षणप्रश्नावरून भाजपला रोखठोक सवाल विचारले. आरक्षणावरून महाराष्ट्रातील समाजमनांत अस्वस्थता आहे. याच अस्वस्थतेला सरकार खतपाणी घात असल्याचा आरोप करून केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असून देखील मराठा आणि धनगर आरक्षण प्रश्न का सुटत नाही? असा खडा सवाल त्यांनी विचारला.
मराठा आणि धनगर आरक्षण मिळावे, याकरिता अनेक संघटनांकडून विविध आंदोलने होत आहेत. परंतु तांत्रिक गोष्टी पुढे करून सरकारकडून ठोस आश्वासन दिले जात नाही. हेच अधोरेखित करून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला धारेवर धरले. बुधवारी दुपारी संसदेतील चर्चेत सहभागी होऊन प्रणिती शिंदे यांनी आरक्षणप्रश्न सोडविण्याची सरकारची मानसिकता आहे काय? असा सवाल करीत महाराष्ट्रात अस्वस्थता वाढविण्याचे काम भाजपच करत असल्याचा आरोप केला.
मनोज जरागेंचे उपोषण, धनगर भावांचे आंदोलन, सरकार निर्णय का घेत नाही?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले. संविधानातील तरतुदीनुसार मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षण लागू झाले. परंतु गेल्या काही वर्षात सत्ताधारी पक्षाने खासगीकरणाचा घाट घातल्याने आरक्षण व्यवस्थेला सुरुंग लागत आहे. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे तर धनगर भावांचेही आरक्षणप्रश्नासाठी आंदोलने होत आहेत. परंतु प्रश्न सोडविण्याऐवजी सरकारकडून दोन समाजांमध्ये तणाव वाढविण्याचे काम होत आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.