Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित , पुढे काय ? आंदोलन कसे चालवणार ?

Spread the love

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी त्यांचे उपोषण १३ ऑगस्टपर्यंत स्थगित केलयाची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना , राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न १३ ऑगस्टपर्यंत सोडवावा, नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली आहे. मंगळवारी (२३ जुलै) रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. उपोषण सोडताना मनोज जरांगे म्हणाले, “सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही. त्याऐवजी मी उपोषण स्थगित करतो.

दरम्यान राज्य सरकारने १३ ऑगस्टपर्यंत आम्हाला आरक्षण द्यावे. खरंतर माझी इच्छा होती की मला सलाईन लावू नये. मात्र माझ्या सहकाऱ्यांनी माझं ऐकलं नाही. त्यामुळे मी स्वतःहून उपोषण स्थगित करून सरकारला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.” यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तूफान टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सलाईन लावून बेगडी उपोषण करण्याला काही अर्थ नाही, सलाईन लावून, एका जागेवर पडून राहून मी उपोषण करणार नाही. मी असं केलं तर तो बेगडीपणा म्हटला जाईल. अशा प्रकारचं उपोषण मी करणार नाही. त्यापेक्षा मी असं उपोषण न केलेलं बरं. मी सलाईन लावून उपोषणाला बसल्याने सरकारलाही काही फरक पडणार नाही. उलट ते या उपोषणाला गांभीर्याने घेणार नाहीत.”

मनोज जरांगे पुढे काय करणार?

जरांगे पाटील म्हणाले, “सलाईन लावून इथे पडून राहण्यापेक्षा मी १०-१२ दिवस महाराष्ट्रभर फिरेन. वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन मराठा समाजाची तयारी करेन. तिथे मोर्चे आणि रॅली काढण्याची तयारी करेन. सरकारमधील लोकांचा जीव त्यांच्या खुर्चीत आहे, ती खुर्ची कशी धोक्यात येईल त्यासाठी मी काम करेन. मी इथे पडून काय करणार? तसेच मी इथेच पडून राहिलो तर हे लोक मला सलाईन लावत राहणार. म्हणूनच मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या उपोषणाने समाजाला न्याय मिळेल की नाही हे माहिती नाही.”

…तर महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघेल ..

सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाही. त्याने सरकारची थोडीफार दमछाक होईल. परंतु, मी आता हे आंदोलन स्थगित केल्यावर सरकारची दमछाक होणार नाही आणि ते देखील या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतील हे मला माहिती नाही. कारण सलाईन लावल्यानंतर मला काही होणार नाही याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे ते गांभीर्याने कामं करणार नाहीत. सलाईन लावल्याने याच्या शरीराला काही होत नाही असा ते विचार करतील. मात्र मी सलाईन न लावता उपोषण चालू ठेवलं तर महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो, या मतावर मी आता आलो आहे. त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर मी पुढच्या कामाला लागेन.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!