Donald Trump News Update : ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा रिपब्लिकन पक्षाचाच कार्यकर्ता , त्याने हल्ला केल्याचे कारणही सांगितले ….

न्यूयॉर्क : पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर येथे एका कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून वाचल्यानंतर त्यांनी देवाच्या कृपेने आपण वाचल्याचे म्हटले आहे. त्यांच्या कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या गोळीबारात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. हल्लेखोराचा नेम चुकला नसता, तर थेट त्यांच्या डोक्यात गोळी लागण्याचा धोका होता. दरम्यान हल्लेखोर त्यांच्याच पक्षाचा असल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले असले तरी रिपब्लिकन पक्षाने तसे अधिकृत जाहीर केलेले नाही.
ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ माजला दरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी (सिक्रेट सर्व्हिस) त्यांच्याभोवती कडे करीत त्यांना सुरक्षितरित्या वाहनाकडे नेले. ट्रम्प यांच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. या गोंधळात सभेला उपस्थित असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सैनिकांनी घटनास्थळीच हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रचारविभागाने त्यांच्या जिवाला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. एफबीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
#WATCH | Gunfire at Donald Trump's rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
"The former President is safe and further information will be released when available' says the US Secret Service.
(Source – Reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
— ANI (@ANI) July 13, 2024
ट्रम्प यांच्यावरील हल्लेखोर कोण?
या गोळीबारानंतर तत्काळ कारवाई करीत एफबीआयने हल्लेखोरांचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) असे असे असल्याचे जाहीर केले. तो पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्क येथील राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने हा हल्ला का केला, त्याच्याबरोबर आणखी कुणी होते की तो एकटाच होता याचा तपास सुरू आहे. हल्लेखोर हा रिपब्लिकन पक्षाचाच नोंदणीकृत सदस्य असल्याचेच वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. पेनसिल्व्हेनियाच्या मतदार नोंदींनुसार याला दुजोरा मिळत असला, तरी अद्याप तपास यंत्रणा किंवा रिपब्लिकन पक्षाकडून तसे जाहीर करण्यात आलेले नाही. थॉमस क्रूक्सच्या सोशल हँडलवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यात त्याने आपण ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचा तिरस्कार करतो असे म्हटले होते.
दरम्यान या हल्ल्याचे वृत्त समजताच अमेरिकेचे अध्यक्ष आणि ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना , ‘देवाची कृपा म्हणूनच मी वाचलो’, असे ट्रम्प म्हणाले. एवढेच नाही तर या हल्ल्यानंतरही आपण स्वस्थ बसणार नसून पुढल्याच आठवड्यात अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आपल्या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी , या क्षणी आता आपण आणखी ताकदीने आणि एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. आपला दृढनिश्चय दाखवून देत अमेरिकन चरित्र काय असते, हे दाखविण्याची आता अधिक आवश्यकता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं निवदेन काय?
“मी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. त्यांनी गोळीबारानंतर तातडीने कारवाई केली. रॅलीत ज्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशात असे कृत्य घडू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. हल्लेखोराबाबत मला तूर्तास काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यानंतर काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं आणि मी खाली वाकलो त्यामुळे माझा जीव वाचला.” असं ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.