दिल्ली मध्येही बेबी केअर सेंटरला आग , ७ मुलांचा करुण अंत , पाच गंभीर ….

नवी दिल्ली : गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग सेन्टरला काल भीषण आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशिरा १२ मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या ५ मुले दाखल आहेत, एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेली माहिती अशी, रात्री ११.३२ वाजता ITI, ब्लॉक बी, विवेक विहार परिसरातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. इमारतीतून १२ नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या राजकोट शहरातील गजबजलेल्या गेमिंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या आणि एक इमारत कोसळल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.
बेबी केअर सेंटर १२० यार्डच्या इमारतीमध्ये बांधण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरून १२ मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी ७ मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि ५ अजूनही दाखल आहेत. आज सकाळी अतिदक्षता विभागात असलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती, तीही आगीच्या भक्ष्यस्थानी होती मात्र सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर पडून आहेत.
आगीत काही ऑक्सिजन सिलिंडरही फुटले, जे घटनास्थळी दिसत आहे. रात्री अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि सुमारे ५० मिनिटांत आग आटोक्यात आणली.
शाहदरा येथील एका इमारतीतही रात्री उशिरा आग लागली
दिल्लीतील शाहदरा भागातील पश्चिम आझाद नगर येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या येथे पाठवण्यात आल्या असून 13 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. चांगली बातमी म्हणजे कोणीही जखमी झाले नाही. सर्वांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
अग्निशमन विभागाने सांगितले की, त्यांना शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री 2.35 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.
गुजरातमध्ये अग्नितांडव
गुजरातमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये लागलेल्या आगीत २४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आग विझल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटलंय.