ElectionNewsUpdate : अचूक अंदाज सांगा आणि २१ लाख जिंका , अंनिसचे ज्योतिष्यांना आव्हान

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे अचूक राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आव्हान दिले आहे. अचूक भविष्य सांगणाऱ्यांना २१ लाखांचे बक्षीस अंनिसने जाहीर केले आहे. राजकीय विश्लेषक सोडून, जे ज्योतिष्यशास्त्र म्हणून राजकीय भविष्य सांगतात त्यांना हे खुले आव्हान देण्यात आल्याचे अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी म्हटले आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे अज्ञानी आणि भोळ्या भाबडया लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. त्यांच्यात अंधश्रध्दा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अनिसने दिली आहे.
आव्हान स्वीकारण्यास प्रश्नावली भरावी लागणार
अंनिसने आव्हान स्वीकारण्यासाठी एक प्रक्रिया तयार केली आहे. त्यासाठी प्रश्नावली देखील तयार केली आहे. ही प्रश्नावली आव्हान स्वीकारणाऱ्यांना भरुन द्यावी लागणार आहे. त्यांचा हा अंदाज अचूक ठरल्यास त्यांना २१ लाख रुपये देण्यात येणार आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांसाठी आहे, असे अंनिसने म्हटले आहे.