CongressNewsUpdate : सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबईच्या जागा मित्रपक्षांकडे गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी….

मुंबई : सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबईच्या जागा मित्रपक्षांकडे गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत अशा स्थितीत या मतदारसंघात दुभंगलेली मने जुळणार कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वर्ष गायकवाड यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर बोलताना पटोले यांनी म्हटले आहे की , खरे तर या जागा मेरिटच्या आधारे काँग्रेसलाच मिळायला हव्या होत्या. शेवटपर्यंत आम्ही किल्ला लढवला परंतु हायकमांडच्या आदेशाचे पालन करावे लागते. ही वेळ एकमेकांविरोधात लढण्याची नाही. भाजपासारख्या हुकुमशाहीला घालवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्ते, नेत्यांना आम्ही समजावून सांगू .
नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाहीपद्धतीने आमचे कार्यकर्ते, नेते बसतील, ते एकत्र बसतील. चर्चा करतील. सांगलीत विश्वजित कदमांनी संघटनेचं काम केले आहे. यावेळी ही जागा कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा होती. पण तोंडचा घास गेल्यासारखं झालं, त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु हायकमांडनं जो आदेश दिला त्याचे पालन करून आता पुढे गेले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
मी स्वत: नाराज आहे. पण….
दरम्यान, मी स्वत: नाराज आहे. पण प्रमुख म्हणून जे आहे त्याला सामोरे जावून भाजपाला पराभूत करायचं त्यासाठी पुढे जायचं आहे. जागावाटप झालं, आता त्यावर चर्चा नाही. आता जागावाटपाचा विषय संपला, आता आपण युद्धाच्या मैदानात आहोत, लढायचं आणि जिंकायचं आहे असंही नाना पटोले यांनी सांगितले. सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेते नॉट रिचेबल झालेत. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही दिल्लीला नाराजी कळवली आहे.
वर्ष गायकवाड यांनी वरिष्ठांना नाराजी कळवली …
दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे सचिव के.सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे कळते. मुंबईत काँग्रेसला २ जागा सोडल्यात त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. या जागेवर वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती. मात्र ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.
मविआची पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. परंतु ज्येष्ठ नेते काही न बोलता निघून गेले. मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड समाधानी नाहीत. ज्या जागा आम्ही निवडून येऊ शकतो त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत. ज्या जागांवर आमची ताकद नाही असा जागा देण्यात आल्याची तक्रार वर्षा गायकवाड यांची आहे. राहुल गांधी यांची मुंबईत यात्रा आली, तेव्हा धारावीतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु तिथे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना मविआकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.